उरसा शिरसा दृष्ट्या वचसा मनसा तथा |
पद्म्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामोऽष्टांग उच्यते ||
- १ मस्तक, २ छाती, ३ दोन पाय, ४ दोन हात,
५ दोन गुडघे, ६ दृष्टी, ७ वाणी ( उच्चार ) आणि ८ मन,
या आठांनी जो नमस्कार करावयाचा त्यास साष्टांग नमस्कार म्हणावें.
सूर्यनमस्कार : औंध... एक संस्कार !

सध्याच्या लोकांमध्ये योग्य व्यायामाचा अभाव आढळून येतो, औंध संस्थांचे अधिपती श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधि हे शास्त्रोक्त पद्धतीने सूर्य नमस्कार घालत असत त्यांच्या अनुभवावरून ते म्हणतात -

" शास्त्रोक्त पद्धतीने सूर्य नमस्कार घातल्याने शरीराच्या प्रत्येक अवयवांना उत्तम मेहनत होऊन कोणताही रोग न होऊं देण्यासारखे ते सुदृढ बनते."
" सूर्यनमस्कार घाला म्हणजे त्यांच्या योगाने तुमच्या अंगी तडफ, धडाडी, साहस इ. क्षत्रागून उत्पन्न होऊन तुम्ही आरोग्यवान व्हाल."

खालील पध्दतीने बाळासाहेब महाराज नमस्कार घालत.
सूर्य नमस्कार घालण्यासाठी ७ फुट लांब व २|| फुट रुंद जागा आवश्यक असते. पायाखाली जमीन सपाट किंवा शहाबादी / कडाप्पा फारशी असली तरी चालते. होतां होईतों स्नान करून सूर्योदयापूर्वी नमस्कार घालावेत, किंवा सूर्योदय होतांच कोवळें ऊन अंगावर पडेल अश्या वेळीं व स्थळीं नमस्कार घालावेत.

 

संकल्पाचा श्लोक :


आचम्‍य प्राणानायम्‍य ।। विष्‍णुर्विष्‍णुर्विष्‍णु: ।।
अद्यपूर्वोच्‍चरित एवंगुणविशेषण वि‍शि‍ष्‍टायां शुभपुण्‍यति‍थौ ।।
मम शरीरे आरोग्‍यता प्राप्‍त्‍यर्थं श्रीसवि‍तासूर्यनारायण प्राप्‍त्‍यर्थं
( सूर्यनमस्कार संख्‍या / वेळ याचा उच्चार ) सूर्यनमस्‍कारान् करीष्‍ये ।।

सूर्यनारायणाची प्रार्थना ( ध्यान ) :


ध्‍येयः सदासवितृ मंडल मध्‍यवर्ती
नारायणः सरसिजासनसन्निविष्‍ट:
केयूरवान् मकर कुंडलवान् किरीटी
हारी हिरण्‍यमयवरपुर्धृत शंखचक्र: ||

पूर्ण मंत्र :


ॐ ऱ्हाम् ऱ्हीम् ऱ्हुम्
ऱ्हैम् ऱ्हौम् ऱ्ह:
मित्र-रवी-सूर्य-भानू
खग-पूषन-हिरण्यगर्भ
मरीच्यादित्य सावित्रृ अर्क
भास्करेभ्यो नमो नम: |

पहिला मंत्र " ॐ ऱ्हां मित्राय नम: " म्हणा. दहा आसनें मिळून एक नमस्कार होतो. ती आसनें येणेप्रमाणे -

आसन १ ' नमस्कारासन ' : ( पूर्ण श्वास घ्या )

नमस्कार घालावयास आपल्या हातानें एक हात चार बोटें असें चौकोनी वस्त्र जमिनीवर पसरावें. सुर्याभिमुख होऊन या वस्त्राला दोनही पाय अगदीं जुळवून पायाचे अंगठे वस्त्राच्या कडेला टेकून ताठ उभें राहावें. हात छातीवर जोडलेले व एकमेकास दबलेले असावेत. छाती पुढें काढून पोट आंत घ्यावें. फुप्पुसें चांगला ताण वाटेपर्यंत फुगवाविंत. दंड फुगवावे. डोळ्यासमोर पाहावें. शरीर मान आणि मस्तक एका रेषेंत ताठ असावींत.
कांहीं उपासना असल्यास त्या उपास्यदेवतेचें किंवा सूर्याचें चित्र समोर लावावें, म्हणजे दृष्टीची एकाग्रता त्यावर करतां येते.
वर सांगितल्याप्रमाणें ताठ उभे राहिल्यानंतर " ओम् -हां मित्राय नम: " हा मंत्र खड्या आवाजांत म्हणा. तोंड मिटा. पूरक करा ( म्हणजे सावकाश पूर्ण श्वास घ्या ) आणि कुंभक करा.

आसन २ ' हस्तपादासन ' / जानु भालासन : ( श्वास सोडा )

कुंभक ठेवून गुडघे न वाकवितां कमर वाकवून दोनही टाळत वस्त्राच्या कोपरावर ठेवा. ते वस्त्राच्या बाहेरच्या कडांना समांतर किंवा त्या कडांपासून २५ अंशाचा कोन करून ठेवा. तळ हात खालीं टेकल्यानंतर मनगटाकडील बाजू आणि पायाचीं बोटें हीं एकाच रेषेंत येतील असें झालें पाहिजे. तळहात टेकल्यानंतर गुडघे ताठ ठेवून नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावा. आणि " मला आरोग्य, कार्यक्षमता व दीर्घायुष्य निश्चयानें प्राप्त होत आहेत " असें अनन्यभावानें मनांत आणा. मग पूर्णरेचक करा. ( श्वास सोडा ).

आसन ३ ' एकपादप्रसरणासन ' आणि ' व्दिपादप्रसरणासन ' / अर्ध भुजंगासन : ( श्वास कोंडून धरा )

पूर्ण पूरक करून एक पाय मागें घ्या. त्याचा गुडघा व बोटें जमिनीवर टेका. पाय मागें घेतांना हात कोपरांत वाकवूं नका. दंड सरळ उभ्या रेषेंत असावे. दुसऱ्या पायाचा गुडघा उभ्या रेषेंत असलेल्या दंडापुढें यावा. वर पहा, आणि डोकें जितकें मागें नेववेल तितकें न्या. कुंभक करा. ( श्वास कोंडून धरा ).

आसन ४ ' पर्वतासन / मूधरासन ' / हस्तपदासन : ( श्वास कोंडून धरा )

कुंभक ठेवून दुसरा पाय मागें न्या. गुडघे वर घ्या. दोन्ही आंगठे, घोटे व गुडघे एकमेकास लावा. दंड सरळ उभ्या रेषेंत ताठ ठेवा. पृष्ठभाग, पाठ व डोक्याची मागील बाजू ही बहुतेक एका रेषेंत असावी. सर्व शरीराचा भाग तळहातांवर व पायांच्या बोटांवर असावा. कुंभक ठेवा.

आसन ५ ' अष्टांग प्रनिपातासन ' /अष्टांगासन : ( श्वास सोडा )

कुंभक ठेवून तळहात व पायाची बोटें न हलवितां दंड वाकवून गुडघे जमिनीस टेका. हनवटी छातीचे वरचे भागास टेकवा. नाक जमिनीस न लावतां मस्तक व छाती जमिनीस टेकवा. पोट खूप आंत ओढा व पृष्ठभाग वर उचला. पूर्ण रेचक करा ( श्वास सोडा ).

आसन ६ ' सर्पासन '/ भुजंगासन : ( श्वास घ्या )

पांचव्या आसनांत दाखवल्याप्रमाणें पायाचीं बोटें, गुडघे व तळहात तसेच ठेवून दंड ताठ करून डोकें वर करतांना सावकाश पूरक करा. ( श्वास घ्या. ) पाठीला बाक देऊन छाती पुढें व बाजूला फुगवून मन अगदीं वर करून छताकडे अगर आढ्याकडे पहा. कुंभक करा.

आसन ७ ' जानु शीरासन ' : ( श्वास कोंडून धरा )

कुंभक ठेवून चौथ्या आसनांत दाखविल्याप्रमाणें शरीर ठेवून दंड न वाकवितां कलते करा. डोकें खालीं व आंत घ्या. टाचा जमिनीस टेकवा. कुंभक ठेवून.

आसन ८ ' एकपादप्रसरणासन ' आणि ' व्दिपादप्रसरणासन ' / अर्ध भुजंगासन : ( श्वास कोंडून धरा )

कुंभक ठेवून उभ्या रेषेंत ठेवून एक पाय पुढे आणा. पुढें आणलेल्या पायाचीं बोटें व तळहाताची मागची बाजू ही एका रेषेंत यावी. पायाचीं बोटें या रेषेच्या मागें राहूं नयेत. ती पुढें गेल्यास चांगलें. पुढें आणलेल्या पायाचा गुडघा त्या बाजूला दंडापुढें यावा. दुसऱ्या पायाचीं बोटें व गुडघा जमिनीस टेकून तिसऱ्या आसनांत दर्शविल्याप्रमाणें डोकें जितकें मागें जाईल तितकें वर पहा. कुंभक तसाच ठेवून.

आसन ९ ' हस्तपादासन ' / जानु भालासन : ( श्वास सोडा )

कुंभक ठेवून दुसऱ्या आसनाप्रमाणें रहा आणि रेचक करा.

आसन १० ' नमस्कारासन ' : ( पूर्ण श्वास घ्या )

पूरक करून पहिल्या आसनाप्रमाणें उभे राहीपर्यंत गुडघे ताठ ठेवा.
हा एक नमस्कार झाला.
दुसरा मंत्र " ॐ ऱ्हीं रवयेनम: " म्हणा. तोंड मिटा. आणि वर सांगितल्याप्रमाणें सर्व आसनें करा म्हणजे दुसरा नमस्कार झाला. या प्रमाणें पंचवीस नमस्कार घातले म्हणजे नमस्कारांचें एक " आवर्तन " होतें.

सूर्यनमस्कार मंत्रोच्चार


ॐ ऱ्हाम् मित्राय नम: |
ॐ ऱ्हीम् रवये नम: |
ॐ ऱ्हुम् सूर्याय नम: |
ॐ ऱ्हैम् भानवे नम: |
ॐ ऱ्हौम् खगाय नम: |
ॐ ऱ्ह: पुष्णे नम: |
ॐ ऱ्हाम् हिरण्यगर्भाय नम: |
ॐ ऱ्हीम् मरीचये नम: |
ॐ ऱ्हुम् आदित्याय नम: |
ॐ ऱ्हैम् सवित्रे नम: |
ॐ ऱ्हौम् अर्काय नम: |
ॐ ऱ्ह: भास्कराय नम: |
ॐ ऱ्हाम् ऱ्हीम् मित्ररविभ्यां नम: |
ॐ ऱ्हुम् ऱ्हैम् सूर्यभानुभ्यां नम: |
ॐ ऱ्हौम् ऱ्ह: खगपुष्पभ्यां नम: ।
ॐ ऱ्हाम् ऱ्हीम् हिरण्यगर्भमरिचिभ्यां नम: ।
ॐ ऱ्हुम् ऱ्हैम् आदित्यसवितृभ्यां नम: ।
ॐ ऱ्हौम् ऱ्ह: अर्कभास्कराभ्यां नम: ।
ॐ ऱ्हाम् ऱ्हीम् ऱ्हुम् ऱ्हैम् मित्ररविसूर्यभानुभ्यो नम: ।
ॐ ऱ्हौम् ऱ्ह: ऱ्हाम् ऱ्हीम् खग पूष हिरण्यगर्भेमरीचिथ्यो नम: ।
ॐ ऱ्हुम् ऱ्हैम् ऱ्हौम् ऱ्ह: आदित्यसविभर्कभास्करेभ्यो नम: |
ॐ ऱ्हाम् ऱ्हीम् ऱ्हुम् ऱ्हैम् ऱ्हौम् ऱ्ह:
ॐ ऱ्हाम् ऱ्हीम् ऱ्हुम् ऱ्हैम् ऱ्हौम् ऱ्ह:
मित्ररविसूर्यभानुखडापुष
हिरण्यगंर्भमरिच्यादित्य । सविमर्कभास्करेभ्यो नम: |
ॐ श्री सवित्रे सूर्यनारायणाय नम: |

समर्पण श्लोक


आदितस्य नमस्कारान ये कुर्वंती दिने दिने
जन्मांतरसहस्त्रेषु दारिद्रयं नोपजायते ||
नामोधर्मविधानाय नमस्ते कृतसाक्षिणे
नम: प्रत्यक्षदेवाय भास्कराय नमोनम: ||

अनेन सूर्यनमस्काराख्येन कर्मणा भगवान्
श्रीसविता सुर्यनारायण: प्रीयतां न मम् ||

अकालमृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनं
सूर्य पादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहं ||

श्वासोच्छास करण्याच्या दोन तऱ्हा :

आतांपर्यंत सांगितलेल्या सर्व कृती करतांना श्वासोच्छास करण्याच्या दोन तऱ्हा आहेत.
पहिली तऱ्हा - नमस्कार घालण्यास उभे राहिल्या बरोबर, तोंड बंद करून दोन्ही नाकपुड्यांनी सावकाश आणि भरपूर श्वास घेऊन, छातींत सांठवून, ती फुगवावी. आणि नमस्कार घालून ज्यावेळी मान मागें नेतो, त्यावेळीं दोन्ही नाकपुड्यांनी तो श्वास हळू हळू बाहेर सोडवा. आणि पुनः पहिल्या प्रमाणें दोन्ही नाकपुड्यांनीं हवा घ्यावी. ती शेवटच्या कृतींत उभे सोडून द्यावी. ही कृति सोपी असल्यामुळें प्रथम हेच नमस्कार घालावे.
दुसरी तऱ्हा म्हणजे प्रथम उभे राहण्याबरोबर जी हवा आंत घ्यावयाची ती दहा कृति संपूर्ण होऊन पुन: उभे राहिल्यावर सोडवायची. ही तऱ्हा जरा कठीण असल्यामुळें संवयीनंतर मग अमलांत आणावी.
ज्यावर दीर्घायुष्य अवलंबून आहे तीं फुप्फुसें अशा श्वासोच्छासानें बळकट व दीर्घश्वसन करणारीं होतात. भरपूर शुध्द हवेनें भरपूर शुध्द रक्त तयार होतें व तें सर्व स्नायूंस आणि मेंदूस मिळाल्यामुळें ते मजबूत, ताजेतवाने व आपलें कार्य करण्यास समर्थ असे होतात.
स्त्रोत : साष्टांग नमस्कार | सूर्यनमस्कार.....
सूर्यनमस्कार ( दहा आसनें )
आसन १ ' नमस्कारासन '
आसन २ ' हस्तपादासन '
आसन ३ ' एकपादप्रसरणासन '
आसन ४ ' पर्वतासन / मूधरासन '
आसन ५ ' अष्टांग प्रनिपातासन '
आसन ६ ' सर्पासन '
आसन ७ ' जानु शीरासन '
आसन ८ ' एकपादप्रसरणासन '
आसन ९ ' हस्तपादासन '
आसन १० ' नमस्कारासन '

समंत्रक नमस्कारापासून आरोग्यसाधन :

आतां ॐ ( प्रणव ), ऱ्हां, ऱ्हीं,ऱ्हूं, ऱ्हैं, ऱ्हौं, ऱ्ह:, या बीजमंत्रांच्या उच्चारानें मेंदूंत, हृदयांत, उदरांत वगैरे स्थानीं काय काय क्रिया होतात आणि या अर्थहीन वाटणाऱ्या बीज मंत्राच्या शुध्द उच्चारापासून निरोगी व आजारी माणसाला कसा फायदा होतो तें पाहूं
( अ ). ॐ या मंत्राला ओंकार किंवा प्रणव असें म्हणतात. याच्या उच्चारापासून हृदयाची क्रिया यथासांग चालण्यास मदत होते. मेंदू उत्तेजित होतो, आणि उदरामध्यें चालना मिळते.
( आ ). ऱ्हां, ऱ्हीं,ऱ्हूं इत्यादि सहा बीजमंत्रांत ह् र् म् हीं व्यंजने असून सर्व स्वर दीर्घ आहेत.
( इ ). प्रत्येक बीज मंत्राला ह् या महाप्राणाची जोड दिली आहे. ह् या अक्षराचा उच्चार हृदयांतून करावयाचा असतो. यामुळें प्रत्येक उच्चाराबरोबर हृदयांमध्यें जोराचें चालन होतें, आणि रक्तशुद्धी होते.
( ई ). या महाप्राणाप्रमाणेंच प्रत्येक बीजाला र् या मूर्घण्याची जोड आहे. मंत्रशास्त्रामध्यें र् या अक्षराचें महत्त्व ॐकराइतकें जवळ जवळ आहे. र् या व्यंजनाचे उच्चाराबरोबर टाळूवर आघात होऊन मेंदू उत्तेजित होण्याचें कार्य होत असतें, या कारणानें ऱ्हां, ऱ्हीं इत्यादि बीजांचा उच्चार केला किं, हृदय, श्वासनलिका व मेंदू या सर्वांना उत्तेजन व चालना मिळून शरीर सुरक्षित असण्याला ज्या तीन अवयवांची विशेष जरुरी आहे ते शुध्द होतात.
अ, इ, उ, औ, अ: आणि ॐ यांच्या उच्चारानें शरीराच्या निरनिराळ्या भागांत कंप उत्पन्न होतात व त्यायोगानें रक्तशुद्धीकरण होऊन निरनिराळे रोग बरे करता येतात.
" ऱ्हां, ऱ्हीं,ऱ्हूं, ऱ्हैं, ऱ्हौं, ऱ्ह: " या बीजमंत्राक्षेंर सूर्य, जगदंबा इत्यादी देवतांच्या उपासकांचीं तर आहेतच, पण बुध्द धार्मिक जैनधर्मिय यांचींहि आहेत.
" ऱ्हां " उच्चार मोठ्यानें केला कीं छातीमध्यें कंप उत्पन्न होतो.
" ऱ्हीं " उच्चारानें गळ्यांत, नाकांत कंप उत्पन्न होतो.
" ऱ्हूं " उच्चारानें पक्वाशयाच्या भागांत कंप उत्पन्न होतो.
" ऱ्हैं " उच्चारानें मूत्राशयाच्या भागांत कंप उत्पन्न होतो.
" ऱ्हौं " उच्चारानें गुदस्नायूंच्या भागांत कंप उत्पन्न होतो.
" ऱ्ह: " या बीजानें सर्वोगांत कंप उत्पन्न होतो.
ऱ्हां, ऱ्हीं या बीजामध्ये " ह " या महाप्राण अक्षराचा उच्चार आहे. या " ह " अक्षराचा उच्चार बेंबीच्या देठापासून करावा लागतो. त्या ठिकाणीं कंप होतो आणि पोटांतील सर्व स्नायूला चालना मिळते.
" र " उच्चाराच्या वेळीं जिभेचा शेंडा टाळूवर आपटावा लागतो. यायोगाने प्रत्येक बीजमंत्राच्या वेळीं पोट आणि टाळू,पचनेंद्रिय आणि बुद्धीचीं इंद्रियें यांना आघात व तज्जन्य कंप मिळतो.

सर्वांगसुंदर व्यायाम

सर्व धर्मांत सूर्योपासना सांगितली असल्यामुळें, आपापल्या धर्माप्रमाणें सूर्यनारायणाची भक्ति करण्याकरितां त्यास साष्टांग नमस्कार घालणें हें प्रत्येक मनुष्याचें धर्माच्या दृष्टीनें आध्य कर्तव्य ठरतें. इतर व्यायामांनीं हात, पाय, मान, पाठ, पोट इत्यादि अवयवांना एकदम एकसारखा व्यायाम मिळत नाहीं. त्याकरितां निरनिराळे व्यायाम करावे लागतात आणि ते होत नाहींत. साष्टांग नाम्स्कारांत या सर्व अवयवांना एकदम आणि एकसारखा व्यायाम मिळतो. इतर व्य्यामांनी ज्यांना ताण पडेल तेवढेच अवयव बळकट होतात. त्यामुळे शरीर बेढबही बनण्याचा संभव असतो. पण साष्टांग नमस्कारानें सर्व अवयवांना व्यायाम मिळत असल्यामुळें सर्वच अवयव पुष्ट होऊन प्रमाणबाद्धतेमुळें शरीर सुंदर दिसतें. शिवाय तो बिनखर्ची व एकट्यास करतां येण्यासारखा आहे. त्यामुळे मनाचीही पवित्रता वाढते.
स्त्रोत : साष्टांग नमस्कार | सूर्यनमस्कार.....
सर्वांगसुंदर व्यायाम
गुगल जाहिरात
' नमस्कारासन '

रथ सप्तमी - जागतिक सूर्यनमस्कार दिन

सूर्य हि एकमेव देवता आहे, जी प्रत्यक्ष दिसते, दाखवता येते. म्हणूनच जगामध्ये सर्वजण या देवतेस मानतात आणि तिची उपासना करतात.

साष्टांग सूर्य नमस्काराचे महत्व / सूचना :


०१) श्रीसूर्यनारायण ही सर्व धर्मांची पूज्य देवता आहे.
०२) तिला प्रसन्न करून घेण्याकरितां रोज ' साष्टांग नमस्कार ' घाला.
०३) मन एकाग्र करून वारंवार निरनिराळ्या अवयावांकडे लक्ष दिल्यानें ते पुष्ट होतात.
०४) दीर्घश्वसन केल्यानें फुप्फुसें बळकट होऊन आयुष्य वाढतें.
०५) सर्व अवयवांस व्यायाम घडून बुद्धि वाढते. हुशारी येते.
०६) व्यायाम सावकाश म्हणजे मिनिटास पांच नमस्कार असा घ्यावा.
०७) व्यायाम एकदम वाढवूं नका व एकदम सोडूं नका.
०८) मिळाल्यास दूध निदान ताक घ्या पण चहापासून अलिप्त राहा.
०९) प्रत्येक आसनामध्ये ठराविक स्नायूंवर ताण येतो. इतर स्नायू मात्र दाबताणविरहीत, स्थिर, शांत, मोकळे असतात.
१०) श्वासाकडे लक्ष देऊन प्रत्येक आसन करावे.
११) प्रत्येक आसनाचे अधिष्ठान शरीरातील उर्जाकेंद्र आहे. या उर्जाकेंद्राकडे लक्ष देऊन प्रत्येक आसन करावे.
१२) या सर्व क्रिया वेळ-वेग, श्वासोच्छवास व आसनक्रिया यांचा ताल धरून करावयाच्या आहेत.
१३) समंत्रक सूर्यनमस्कार ॐ आणि सूर्यमंत्र यांचा उच्चार करून घालवायचा असतो. बीज मंत्रासह सूर्यनमस्कार आहेत. तृचाकल्प सूर्यनमस्कार यामध्ये ॠग्वेदातील ॠचा येतात. हंसकल्प सूर्यनमस्कार यामध्ये यजुर्वेदातील ॠचांचा समावेश आहे.
१४) सूर्यनमस्काराचे एक आवर्तन चोवीस सूर्यनमस्काराचे असते. सूर्यनमस्काराचे देवी गायात्रीची / आदिशक्तीची / आदिमातेची उपासना आहे. गायात्रीमंत्रातील शब्द चोवीस, दिवसाचे तास चोवीस, शरीरावरील न्यासस्थाने चोवीस, वेदात व गीता तत्त्वज्ञाना प्रमाणे विश्वातील मूलतत्वे चोवीस (अधिक एक परमात्मा). म्हणूनच बारा सूर्यनमस्काराचे अर्धे आवर्तन 12+01 असते.
१५) सुर्य्नास्काराचे एक आवर्तन 24+01 असे असते.
१६) प्रत्येकाची सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता त्याची शरीर प्रकृती, आरोग्य, वजन-उंची, व्याधी-विकार, वय यावर अवलंबून असते. आपल्या तब्बेतीला झेपतील येवढेच सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्काराची संख्या फार संथ गतीने वाढवा.
१७) सुरुवातीला पंधरा मिनिटांमध्ये फक्त तीन सूर्यनमस्कार घाला. जसा सराव वाढेल त्याप्रमाणात, वेळ तोच पण सूर्यनमस्काराची संख्या या 12+01 येवढी वाढेल.
१८) पुढील पंधरा मिनिटांमध्ये आणखी बारा सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता हळूहळू निर्माण होईल. यानंतर सूर्यनमस्काराचा वेग-वेळ, ताल-श्वास याकडे लक्ष ध्या.

नमस्कार वाढविण्याचें प्रमाण :

 

वय

सुरवातीस नमस्कार वाढविण्याचें प्रमाण.

अखेर नमस्कार.

७ ते १०

१    ४ दिवसांनी    १

२५

११ ते १४

२    ४ दिवसांनी    २

५०

१५ चे पुढें   ४ 

४    ४ दिवसांनी    ४

१०८

 

सुरवातीला किमान एक महिना दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तीन सूर्यनमस्कार सावकाश योग्य पद्धतीने घाला. त्याचा प्रभाव पहिल्याच दिवशी जाणवेल. हा प्रभाव स्विकारण्याची शारीरिक क्षमता वाढवा. सुरुवातीला साधारण पंधरा मिनिटांमध्ये तीन सूर्यनमस्कार पूर्ण करा. तुमच्या सरावातील अनुभव जसा वाढेल तसा वेळ तोच पण सूर्यनाम्स्कारांची संख्या बारा पर्यंत जाईल.

साष्टांग म्हणजे फक्त आठच जागीं अंग जमिनीस टेकवून घातलेला नमस्कार. दोन पायांचीं बोटें, दोन गुडघे, दोन हात, छाती व कपाळ हीं आठ अंगें टेकवायचीं.

 

स्त्रोत : साष्टांग नमस्कार | सूर्यनमस्कार.....
सूर्यनमस्कार
' नमस्कारासन '
सूर्यनमस्कार
गुगल जाहिरात

साष्टांग नमस्कार घालतांना कोणती कृती कशी करावयाची हें समजून घेऊन त्याप्रमाणें घडले तर थोड्याच काळांत सिद्धी प्राप्त झाल्यासारखा फायदा झालेला दिसून येईल.

 

सूर्य नमस्काराचे फायदे :

१) शरीराची लवचिकता व चापल्य टिकून राहते.
२) नदीशुध्दीकरण होऊन रक्ताभिसरणाची क्रिया उत्तम चालते.
३) जीर्ण पेशींचे उच्चाटन व नवीन पेशींची निर्मिती चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
४) प्राणशक्तीचा संचय होऊन कार्यक्षमता वाढते.
५) बौद्धिक काम असो अगर शारीरिक कष्ट असो थकवा न येता उत्साह कायम टिकून राहतो.
६) स्थूलता व जडत्व येत नाही. नेहमी हलके वाटते.
७) स्वभाव सात्त्विक होतो.
८) ज्ञानतंतूची केंद्रे संवेदनाक्षम बनतात त्यामुळे बुद्धीची वाढ होते.
९) मनाची एकाग्रता वाढते व मानसिक शांतता लाभते.
१०) आपत्तींना, संकटांना तोंड देण्यास शरीर, मन समर्थ बनते.
११) शरीराला योग्य आकार येऊन व्यक्तिमत्त्व निर्माण होते.
१२) शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक शक्तीचा विकास साधतो.
१३) पोटाचे स्नायू बळकट होऊन पचनशक्ति वाढते.
१४) मांड्यांचा दाब पोटांतील अवयवांवर पडल्यामुळें ते सुधारतात. डाव्या मांडीचा दाब पडून पांथरी सुधारल्याचा अनुभव येईल.
१५) ज्या अवयवावर आपण लक्ष ठेवूं, तिकडे रक्त वाहूं लागून तो अवयव अधिक बळकट होण्यास चांगली मदत होते.
१६) गळ्याच्या व मानेच्या स्नायूस ताण मिळून ते बळकट होतात.
१७) घशांत होणाऱ्या मेंढक्या ( थंड आणि उष्ण पदार्थांच्या सेवनानें घशांतील गांठी सुजून अन्न वगैरे गिळतांना घशांत दुखतें. ) पार मोडून जाऊन घसा साफ होतो.
१८) दंड पिळदार व मनगटें बळकट होतात.

 

सूर्यनमस्कार साधनेचे वैशिष्ट्य :

कोणतेही साधन, जादा जागा, जादा पैसा, जादा वेळ लागत नाही. स्त्री-पुरुष, लहान-थोर, वृद्ध-बाल कोणीही हा व्यायाम, ही उपासना करू शकतात.

सूर्यनमस्कार मंत्राचे सामर्थ्य :

सकळ दोषांचा परिहार | करिता सूर्य नमस्कार | स्फूर्ती वाढे निरंतर | सूर्यदर्शन घेता ||

होमहवन, यज्ञ, पूजा करताना मंत्रोच्चार करणे ही आपली पारंपारिक पध्दत आहे. मंत्रोच्चाराने ३ मुख्य गोष्टी साध्य होतात.

१) बोलणाऱ्याला मनाची शांती लाभते व वाणी शुध्द होते.
२) ऐकनाऱ्यास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते.
३) मंत्रोच्चाराने वातावरणात विशिष्ट कंपने निर्माण होऊन वातावरण शुद्धी होते.

 

स्त्रोत : साष्टांग नमस्कार | सूर्यनमस्कार.....
सूर्यनमस्कार
' नमस्कारासन '
गुगल जाहिरात

आपले आरोग्य, प्रकृति रोज नियमित व्यायामानें घट्ट करता येते व ती प्रत्येक स्त्री पुरुषाने केली पाहिजे; तरच तो समाजाची व राष्ट्राची सेवा करू शकेल. या दृष्टीनें बाळासाहेबांनी तरुण पिढीवर उपकार केलेले आहेत. नामस्कारावर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेंत पुस्तके लिहली आहेत.

 

नमस्काराची फिल्म :

ऱ्हां, ऱ्हीं उच्चार कसे करावेत हें सहज समजावें म्हणून एक टाकी फिल्मही पंधराशें फुटांची घेतलेली १९३६ सालीं युरोपखंडाच्या यात्रेस गेलेवेळीं ती फिल्म व ती टाकी फिल्म हिं अनेक देशांत दाखवले. इंग्लंडात ती टाकी तेथील व्यायाममंडळाला दिली. कांहीं वर्तमानपत्रकर्त्याच्या लुइसमार्गन नांवाच्या बाई बातमीदारानें बाळासाहेबांची गांठ लंडन येथें सेव्हाय हॉटेलमध्यें घेतली. नमस्कार त्यांना प्रत्यक्ष घालून दाखविले. निकोप शरीरप्रकृति सत्तरीमध्ये कशी या व्यायामानें राखतां येते हें त्यांना प्रत्यक्ष उदाहरणावरून पटविलें. यामुळें त्या बातमीदारानें वर्तमानपत्रात लेख लिहले. त्याच बातमीदारानें महाराजांच्या परवानगीनें आपल्या हिंमतीवर " Ten Point way to Health " म्हणून पुस्तक लिहलें. हजारों प्रती सर्व युरोपखंडात खपल्या. नमस्कार व्यायामाचा प्रसार झाला. इंग्लडांत तर प्रत्येक लहानमोठ्या शाळेंत हा नमस्काराचा व्यायाम आवश्यक म्हणून ठरला आहे. अमेरिकन वर्तमानपत्रांतही यासंबंधाचे लेख आले होते. अशा रीतीनें सर्व जगभर या नमस्कार व्यायामाचा प्रसार झाला.

'सूर्यनमस्कार' हे पुस्तक :

१९२१ साली श्री. भवानराव, राजेसाहेब औंध संस्थान यांनी पहिल्यांदा मराठी व इंग्रजीमध्ये 'सूर्यनमस्कार' हे पुस्तक छापले. त्याचे भाषांतर कानडी, तामीळ, गुजराती, बंगाली, हिंदी, तेलगू भाषांत झाले.
पुढे १९३५ साली इंग्लंडमध्ये श्रीमती लुईस मार्गन् या महिलेने श्री भवानरावांची मुलाखत घेऊन 'A TEN POINT TO HEALTH' हे पुस्तक काढले. १९८५ पर्यंत या पुस्तकाच्या ३६ आवृत्त्या झाल्या व ५,००,००० पुस्तके खपली.

दोन हजार पौंडांची श्रीसुर्य्नारायाणास दक्षिणा :

संडेरेफरी म्हणून एक रविवारी निघणारें वर्तमानपत्र लंडनमध्यें आहे. त्याच्या दोनतीन लाख प्रती खपत कोणी एकानें " औंधचा राजा नमस्काराचा व्यायाम आपल्या राज्यांतील स्त्रीपुरुषांनीं घेतलाच पाहिजे अशी सक्ती करतो व नमस्कारानें स्त्रिया सडपतळ व बांधेसूद झाल्या म्हणजे त्यांना आपल्या जनानखान्यांत नेतो " असा मजकूर छापला. आप्पासाहेबांच्या निदर्शनास हें वृत्त येताच त्या वर्तमानपत्रकर्त्यावर अशा भ्रष्ट मजकूरसंबंधानें फिर्याद केली. तो पत्रकर्ता घाबरला. त्यानें कोर्टात सपशेल माफी मागितली आणि भुर्दंड म्हणून २००० हजार पौंडांची रक्कम दिली.
सूर्यनारायणाची कृपा समजून ही रक्कम व्याजानें लाविली. त्या व्याजांतून ठिकठिकाणीं नमस्कार प्रचारक फुकट पाठविले. अनेक शाळांतील विध्यार्थी विध्यार्थींना नमस्कार शिकवले. हिमालयापासून भरतखंडाच्या ज्या ज्या भागांत इंग्रजी हिंदी चालते त्या त्या भागांत प्रचारकाला जातां येते. व नमस्कारांच्या व्यायामाची लोकांना शिकवण्याची सोय लावली . हें प्रचारक व्याख्यानें देऊनही अनेक स्त्रीपुरुष समाजाला नमस्काराची उपयुक्तता सुलभता पटवून देत.

औंध संस्थानातील शाळांमध्यें सक्तीचा व्यायाम.

प्रेत्येक शाळेंत व हायस्कुलांत सूर्य नमस्काराचा व्यायाम सक्तीचा करावा, असा नियम बाळासाहेबांनी औंध संस्थांच्या शाळानिहाय केला आहे. आणि ७/८ वर्षांत नमस्काराच्या योगानें औंध संस्थानातील सर्व विध्यार्थांच्या व विध्यार्थीनींच्या शारीरिक समर्थ्यांत, आरोग्यांत व शरीरबांध्यांत आश्चर्य करण्यासारखी सुधारणा झाली आहे. याची प्रचीति त्या विध्यार्थींजणांना प्रत्यक्ष पहिल्यानें किंवा बाळासाहेबांनी तयार केलेली नमस्काराची फिल्म पहिल्यानें येईल. हाच नमस्काराचा व्यायाम आखिल हिंदुस्थानांत सर्वत्र घेतला जाईल तर ५ वर्षांत शरीरसामर्थ्यामध्यें आणि तेज्स्वीपनामध्यें क्रांती होईल, यांत शंकाच नाहीं.
प्रचारकांना हिमालयापासून मद्रासेपर्यंतच्या प्रचारकार्यासाठीं पाठविलें. हिज हायनेस महाराजा ऑफ टेहरी गाढवाल यांनी देशपांडे प्रचारक दोन महिने नरेंद्र नगर आणि टेहरी येथें ठेवून घेतला. त्या प्रमाणे अंमळनेर, मुंबई, बडोध्यास प्रचारक १ १/२ ते २ महिने राहून नमस्कारांचा प्रसार केला.

औंध संस्थानांतील सूर्योपासना मंदिरें :

औंध संस्थानांतील प्रत्येक शाळेंत सुर्यनमस्कारांचा व्यायाम सक्तीने सुरु केलेला होता. त्याप्रमाणे तो नियमित घेतलाहि जात होता. पण एका शाळेंतील सर्व मुलांनी एकाच ठिकाणीं, एकाच वेळीं सुर्यनामास्कारांचा व्यायाम घेण्याजोगी प्रशस्त इमारत एका औंधाशिवाय दुसरीकडे नव्हती; पण श्रीमंतांनी केलेल्या सुर्यनमस्काराच्या तपश्चर्येच्या प्रभावाने कुंडल व आटपाडी येथे प्रशस्त अशीं श्रीभवानराव सूर्योपासना-मंदिरें उभारलीं गेलीं आहेत.

सूर्यनमस्कार विषघ्नही आहेत :

या सूर्यनमस्काराच्या व्यायामानें बाळासाहेबांना तीन वेळां मृतुच्या दाढेंतून वांचविलें.
"१९१३, १९३४ आणि १९४४ सालीं झालेल्या भयंकर विषप्रयोगांतून सुर्यनमस्काराच्या योगानें आलेल्या रोगविषप्रतिबंधक शक्तीमुळेंच !!"
"तुम्ही सूर्यनारायणाच्या कृपेनें वांचला " असें खुद्द डॉक्टर भडकमकर म्हणाले.
या सुर्यनारायानाच्या नमस्कार व्यायामानें माणसाच्या अंगांत अशी कांहीं रोगप्रतिबंधक शक्ति येते कीं वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी सुध्दां आंगातील स्टॅमिना भयंकर रोगालाही मागें सरतो.

सूर्यनमस्कार घाला !

" माझी महाराष्ट्रापाशी भिक्षा एवढीच आहे की, सूर्यनमस्कार घालून आरोग्यसंपन्न व्हा. एवढी भिक्षा घाला म्हणजे आमच्या आगमनाची आठवण चिरकाल टिकून आमच्या येण्याचें चीज झाल्यासारखें होईल."

- श्रीमंत बाळासाहेब पंडित पंतप्रतिनिधि, संस्थानाधिपती, औंध.

 

स्त्रोत : साष्टांग नमस्कार | सूर्यनमस्कार.....
सूर्यनमस्काराचा प्रसार
श्रीभवानराव सूर्योपासना मंदीर,कुंडल.
श्रीभवानराव सूर्योपासना मंदीर,आटपाडी.
' नमस्कारासन '