कलाप्रेमी राजाचा हा सुंदर दरबार,
ऋतूंना जिवंत करणारा कोण हा शिल्पकार ?
मातृत्व शिल्प श्रेष्ठ कि प्रणयीभाव,
हि शिल्पाशिल्पांची स्पर्धा कोण जिंकणार ?
मनातील रंग हे गहिरे, चित्रांत कसे उमटले ?
प्रत्येक कलाकृतीत मन हे हरवले !
श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय : औंध... एक कलासंग्रह !

निर्मिती इतिहास :

औंधच्या भवानी संग्रहालयातील शिल्प, चित्रे, कोरीव शिल्पे, सोने आणि चांदीच्या मूर्ती या सर्व एकत्र जमविण्याचे काम एका माणसाने केले, ते म्हणजे औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी. या संग्रहालयामध्ये पदेशातील ठिकठिकाणच्या तसेच भारतातील अनेक वस्तू एकत्र ठेवलेल्या आढळतात. १९१९ मधील एक गोष्ट चार बैल असलेल्या एका खास बैलगाडीतून संग्रहालयासाठी एका मोठ्या लाकडी पेटीमधून एक वस्तू आणण्यात आली होती. पेटी उघडल्यावर त्यात संगमरवराची एक सुंदर मूर्ती बाहेर काढण्यात आली. ग्रीक देवता 'डायना' ची हि मूर्ती होती. पॅरीसमधल्या लुव्हरे म्युझियममधल्या मूर्तीची हि प्रतिकृती होती. त्यानंतर सुमारे पंचवीस वर्षानंतर म्हणजे १९३७ मध्ये भवानराव पंत यांनी हेन्री मूर या जगप्रसिद्ध शिल्पकाराने बनवलेले एक शिल्प ( मदर अॅण्ड चाइल्ड ) या संग्रहालयासाठी मिळवले. हे शिल्प त्या वेळी त्यांनी चाळीस डॉलरला विकत घेतले होते. जाणकारांच्या मते आज या चित्राची किंमत कोट्यावधी रुपये आहे.
भवानराव ज्या वेळी औंध संस्थांचे राजे झाले त्या वेळी म्हणजे म्हणजे १९०९ मध्ये राजवाड्यामध्ये एकही कलात्मक वस्तू नव्हती. भावनरावांच्या आगमनानंतर मात्र विविध प्रकारची चित्रं, शिल्प, गालिचे इत्यादी वस्तूंनी राजवाडा भरून गेला.
कलात्मक वस्तूंचा संग्रह करण्याची त्यांना विशेष आवड होती. वेगवेगळ्या वस्तू ते उत्साहाने जमवीत असत. भावनरावांच्या बालपणापासून त्यांच्या वडिलांनी कलेची आवड लावल्यामुळे त्यांना कलेमध्ये विशेष स्वारस्य निर्माण झाले होते.
१९०१ मध्ये भावांरावांचे वडील श्रीनिवासराव यांचे निधन झाले. त्या वेळेपर्यंत भवानराव चित्रकलेत पारंगत झाले होते. त्यांनी स्वतःची अनेक तैलचित्रे बनवली होती. या काळात भवानरावांनी काढलेली रामायणावरील चित्रे आजही भवानी संग्रहालयात आहेत.
भावांरावांनी स्वतः १८८८ ते १९०५ या काळात त्रावणकोरच्या रविवर्मा यांच्या स्टुडीओला अनेकदा भेट दिली. भावांरावांचे स्वतःचे तंत्र मात्र खास असे होते. त्यांनी म्हभार्ताव्र काढलेल्या बारा मोठ्या चित्रांमध्ये हि शैली उठून दिसते.हि चित्रे सध्या औंधच्या श्री यमाई मंदिरात पहावयास मिळतात. तसेच रामायणावर भावांरावांनी काढलेली साठ चित्रं हीसुद्धा खास त्यांच्या शैलीतलीच आहेत.
औंधमध्ये १९१२ ते १९३४ या काळात जगातल्या वेगवेगळ्या भागांतून विविध वस्तू आणल्या जात होत्या. सोन्याची नाणी, गालिचे, चादरी अशा वेगवेगळ्या वस्तू त्यात होत्या. दिल्लीहून आलेल्या कलात्मक वस्तू विकणाऱ्या एका व्यापाऱ्यासह भवानराव महाबळेश्वरला गेले. तिथे या व्यापाऱ्याने त्यांच्यासाठी दिल्लीहून आणलेली 'अष्टनायिका' हि चित्रांची मालिका दाखवली. हि पाहून राजे भावांरावांना इतका आनंद झाला, कि त्यांनी आजूबाजूच्या सगळ्यांना बोलावून हि चित्रे दाखविली आणि त्या सतराव्या शतकातील चित्रांबद्दल माहिती सांगितली. १९२७ ते १९३७ या काळात भवानरावांनी अशा प्रकारचे चित्रांचे अनेक संच विकत घेऊन ते आपल्या संग्रही ठेवले.
पंजाबी कलाकारांची एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला बनविण्यात आलेली काही चित्रे या काळात भवानरावांनी आणली होती. हि चित्रे महाभारतातील प्रसंग चित्रित करणारी होती. त्यामध्ये काही चित्रे तर अतिशय सुंदर होती.
भवानराव १९३५ मध्ये आजारी पडले. त्यांना या आजारात खूपच थकवा आला, त्यामुळे डॉक्टरांनी हवापालटासाठी त्यांना युरोपच्या दौऱ्यावर जाण्याचा सल्ला दिला. भवानराव सहा महिन्यांसाठी युरोपच्या दौऱ्यावर गेले. या दौर्यात त्यांनी जर्मनी, फ्रांस, इटली, स्पेन इत्यादी युरोपीय शहरांमधील अनेक संग्रहालये पहिली, बराच प्रवास केला, आणि खूप काही शिकले. या दौऱ्यावर भवानरावांनी त्या काळात दहा हजार रुपये खर्च केले. युरोपमधील महत्वाची मानली जाणारी सुमारे वीस संग्रहालये पाहिल्यानंतर भावांरावांनी भारतात अशा प्रकारचे मोठे प्रशस्त आणि भरपूर हवा व प्रकाश असलेले संग्रहालय बांधण्याचे ठरविले.
१९३६ पर्यंत भवानरावांनी शेकडो आकर्षक वस्तू जमविल्या होत्या. रंगीत दगड आणि खडे एकत्र चिटकवून तयार केली गेलेली मोईझाक चित्रे त्यांनी त्या काळात जमविली होती. त्यामध्ये 'इम्प्रेशनिस्ट' म्हणून ओळखली जाणारी 'क्युबीस्ट' म्हणून प्रसिद्ध असलेली तसेच अमूर्त चित्रेही होती. युरोपमधील संग्रहालयामध्ये पाहिलेल्या काही अभिजात चित्रांच्या प्रतिकृती त्यांनी येथे मिळविल्या होत्या. राजे भवानरावांनी कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या आपल्या पुतण्याला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी आणि संग्रहालये पाहण्यासाठी खास युरोपला पाठविले होते. त्यांच्या पुतण्याने फ्रांस, इंग्लंड, इटलीमधील अनेक संग्रहालये पहिली आणि तेथील चित्रांच्या प्रतिकृती येथे बनविल्या.
भवानरावांकडे शिल्पांचाही मोठा संग्रह होता. मायकल अँजेलोचे प्रसिद्ध चित्र 'डेव्हिड' हे त्यांना फार आवडत असे. त्याची एक प्रतिकृती त्यांनी बनवून घेतली होती. आज भवानी संग्रहालयात आपल्याला अनेक सुंदर सुंदर शिल्पे, आणि काही शिल्पांच्या प्रतिकृती आढळतात.
एकदा भवानराव महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमधल्या २६ कलाकारांना (शिल्पकारांना) घेऊन अजिंठा, वेरूळ लेण्यांमध्ये गेले आणि या शिल्पकारांना त्यांनी तिथल्या सुंदर शिल्पांच्या प्रतिकृती बनविण्यास सांगितले त्या वेळी या शिल्पकारांनी बनविलेल्या पतीकृती आजही सर्वत्र प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत अजिंठा- वेरूळमधील शिल्पांची बनविण्यात आलेली सर्वात सुंदर चित्रे हीच आहेत.
आज भवानी संग्रहालयात असणाऱ्या चित्रांमध्ये राजा रविवर्मा. नंदलाल बोस, रवींद्रनाथ टागोर, धुरंधर बाबुराव पेंटर, माधवराव आळतेकर अशा अनेकांची चित्रे आहेत.
१९२३ मध्ये भावानरावांनी बरमप्पा नावाच्या एका चित्रकाराला कर्नाटकातून आपल्या घरी आणले आणि त्याला तेथेच ठेवले. हा खरोखरीच प्रज्ञावान चित्रकार होता. आज भवानी संग्रहालयात दिसणारी अनेक चित्रे या बरमप्पानेच बनविलेली आहेत. असाच एक दुसरा शिल्पकार म्हणजे रामचंद्र गुडीयार. हा कारवारचा होता. त्याला भावनरावांनी औंधला बोलावून त्याच्याकडून अनेक शिल्पे बनवून घेतली. तो लाकडापासून अप्रतिम मूर्ती बनवत असे. रामचंद्र गुडियार याने अनेक वर्ष कष्ट घेऊन त्याच्या गावात अनेक शिल्पे तयार केली होती. एखादे उत्तम शिल्प बनविले की ते घेऊन तो औंधला जात असे आणि भावनरावांना दाखवीत असे. त्यांनी एकदा पाच फुटी भव्य चौकात आणून भावनरावांना दिली होती. या चौकटी मध्ये रामायणाविषयी अनेक चित्रे होती.भावनरावानंनी हि फ्रेम पंधराशे रुपयात विकत घेतली. आज या फ्रेमची किंमत लाखो रुपये असावी असा अंदाज आहे.
केशव देशपांडे नावाचा एक तरुण कलावंतही या काळी भवानरावांकडे येत असत. तो कर्नाटक चा होता. हा मुलगा भवानरावांकडे १९२० ते १९३६ पर्यंत राहिला. तो हस्तिदंतावर उत्कृष्ट कोरीवकाम करत असे. त्याने काही विमानांच्या प्रतिकृती ही तयार केल्या होत्या. त्याने तयार केलेली अनेक शिल्पे भवानी संग्रहालयात ठेवलेली आहेत.
१९५१ नंतरच्या काळात श्रीमंत बाळासाहेब महाराजांचे चिरंजीव श्रीमंत अप्पासाहेब पंत हे प्रदेशात भारताचे राजदूत म्हणून गेले असताना त्यांनी संपादन केलेल्या तिबेटीयन आणि इजिप्तशियन काही मौल्यवान वस्तू आणून या संग्रहालयात भर घातली.
भावनरावांना इथल्या जनतेबद्दल खूप प्रेम होते. सामान्यानसाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांच्या मनात सतत असायचे. जनता सुसंस्कृत आणि कलांचा आस्वाद घेऊ शकणारी असावी, असे भवानरावांना वाटत असे. त्यांची ही इच्छा गेल्या पन्नास वर्षाच्या काळात थोड्याफार प्रमाणात पूर्ण झाली आहे. असे म्हणता येईल भवानी संग्रहालयाला हजारो लोक भेट देतात तिथल्या उच्च दर्ज्याच्या चित्रांचा आणि शिल्पांचा आनंद घेतात. त्यातील काही मंडळी कलावंत असतात. त्यांना हे पाहून स्फूर्ती मिळते आणि ते नवनवीन कलात्मक वस्तू बनवितात. अशा प्रकारची संग्रहालये राज्यभर ग्रामीण भागात सर्वत्र असावीत, अशी भावनरावांची इच्छा होती. खेड्यातील लोकांपर्यंत कलात्मक वस्तू आणि संस्कृती पोहचावी, असे त्यांना वाटत असे.

संग्रहालयाची निर्मिती :

स्वतःच्या खासगी दौलतीतून जगाच्या कानाकोपऱ्यातून उत्तम कलाकृती, शिल्पे, दुर्मिळ वस्तू औंधला आणल्या. त्यातूनच त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी श्री यमाईदेवीच्या डोंगरावर अप्रतिम अशा "श्री भवानी चित्र-पदार्थ पुराणवस्तू संग्रहालया'ची निर्मिती केली.
जमवलेल्या सर्व कलाकृती जतन करण्यासाठी व त्या लोकांना पाहता याव्यात, यासाठी आयुष्याच्या उत्तरार्धात भवानरावांनी १२ एप्रिल १९३७ रोजी श्री भवानी संग्रहालयाच्या वास्तूचे काम सुरू केले। ता. १२ जुलै १९३८ रोजी ते पूर्ण झाले. त्या काळी या वास्तूसाठी ७० हजार रुपये खर्च आला. या वास्तूच्या रचनेचा आराखडा स्वतः भवानरावांनीच तयार केला. युरोपच्या दौऱ्यात त्यांनी अनेक संग्रहालयांच्या इमारती पाहिल्या होत्या. त्यांचा अभ्यास केला होता. त्यातूनच त्यांनी फारसा डामडौल नसलेली; परंतु कलाकृती पाहण्यासाठी येणाऱ्यांचा पूर्ण विचार करून या वास्तूची रचना केली. संग्रहालयात एक प्रवेशद्वार आणि एक दिशामार्ग असल्यामुळे एका दालनातून दुसऱ्या दालनात जात चौदापैकी एकही दालन पाहावयाचे राहून जात नाही. वास्तुरचनेत प्रकाशाचा अतिशय कल्पकतेने वापर करून घेतल्यामुळे चित्रे व शिल्पे पाहताना वेगळा आनंद मिळतो. संग्रहालयात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करण्यात आला आहे. आता यासारखीच आणखी एक इमारत शेजारी आहे. त्या ठिकाणी चित्र-शिल्पांची नव्याने आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. सर्व चित्रे, शिल्पे आणि नानाविध वस्तू पाहून आपण संग्रहालयाच्या पायऱ्या उतरू लागतो, तेव्हा छोट्याशा संस्थानच्या कलाप्रेमी राजाच्या छंदातून उभे राहिलेले हे संग्रहालय पाहून मन थक्क होते.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय.....
श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी
औंधचे भवानी संग्रहालय
मदर अॅण्ड चाइल्ड शिल्प - हेन्री मूर
सौंदर्यदेवता शिल्प
औंधचे भवानी संग्रहालय
माणिक शिल्प - गणेश
या संग्रहालयात प्रवेश करतानाच बाळासाहेबांचे भव्य तैलचित्र नजरेस पडते. त्यातून हे काय व्यक्तिमत्त्व असावे, याची कल्पना येते.
या विभाग मध्ये राजघराण्यातील स्त्री- पुरुषांची नामवंत चित्रकारांनी काढलेली चित्रे लावण्यात आलेली आहेत. तसेच या विभागात बाळासाहेब महाराज यांचे विदेश दौरे व मित्रपरिवार यांचे दुर्मिळ फोटो लावलेले आहेत. याच दालनात महाराजांची कुंडली, हस्ताक्षर, अर्धपुतळा, त्यांचे शेलेपागोटे, काही राज्घाराण्यैल पैठण्या ठेवण्यात आल्या आहेत.
बाळासाहेब महाराजांनी चित्र काढण्याचे स्वतःचे खास तंत्र विकसित केले. त्यांनी महाभारत, रामायणातील प्रसंगांवर काढलेल्या चित्रात त्यांची शैली दिसते. त्यांच्यावर लघुचित्रशैलीचा प्रभाव होता. पारंपरिक चित्रांपेक्षा काही वेगळे धाडसी प्रकारही त्यांनी चित्रात आणले. रामायणावरील त्यांच्या चित्रमालिकेत हनुमान हा अन्य वानरांप्रमाणेच साधा दाखवला आहे. हनुमानाला कुठेही दागिने अथवा मुकुट नाही. राम-लक्ष्मण वनवासात असताना त्यांच्या दाढी-मिशा वाढलेल्या असणार, हे लक्षात घेऊन त्यांच्या वनवासकाळातील चित्रांमध्ये श्रीमंतांनी त्यांना दाढी-मिशा काढल्या आहेत. अशा प्रकारची ही चित्रे दुर्मिळच म्हणावी लागतील. श्रीमंतांच्या चित्राचे संग्रहालयात वेगळे दालन आहे. त्यातील रामपंचायतन, जटायू वध, लंकादहन, हनुमान द्रोणागिरी पर्वत आणीत आहे, ही चित्रे उठून दिसतात. त्यांचे गाजलेले रामपंचायतन हे चित्रही येथे आहे.
चित्ररामायण मालिका : श्रीमंत बाळासाहेब महाराज यांनी सन १९११ - १२ च्या दरम्यान स्वत: काढलेल्या चित्रमय रामायणाची कथा येथे पाहायला मिळते. महाराजांनी चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध ज्ञान घेतले न्हवते किंवा त्यांच्या चित्रकलेवरती कुठल्याहि एका चित्रशैलीचा प्रभाव नव्हता. त्यामुळेच त्यांच्या चित्रामधील वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणा जाणवल्या शिवाय राहत नाही.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय.....
बाळासाहेब यांचें पहिलें तैलचित्र
चित्ररामायण

भारतीय चित्रकार दालन :

यामध्ये नामवंत भारतीय चित्रकारांनी काढलेल्या कलाकृतींचा समावेश होतो. राजेसाहेबांनी स्वतः उत्तम चित्रे काढलीच; शिवाय अन्य चित्रकारांकडूनही अद्वितीय काम करून घेतले. ही मंडळी अगदी सामान्य पार्श्‍वभूमीतून आलेली होती. त्याममध्ये भिवा सुतार, भरमाप्पा कोट्याळकर, रामचंद्र सुबराव गुडिगार, महादेव पाथरवट, केशव देशपांडे यांचा समावेश होतो. या कलाकारांना त्यांनी संस्थानात ठेऊन घेतले. त्यांना सन्मान दिला. त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रतिभेला आव्हान केले आणि त्यातून अनेक दर्जेदार कलाकृतींची निर्मिती झाली. त्याचबरोबर रावबहादूर एम. व्ही धुरंधर, लालकाका, बाबूराव पेंटर, पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, माधवराव सातवळेकर, रा. द. चितारी यांच्याकडूनही दर्जेदार कलाकृती निर्माण करून घेतल्या.
मुल्लर - औरंगजेब कैदेतील श्री. छत्रपती शिवाजी महाराज.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रांचे स्वतंत्र दालन येथे आहे. शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या कैदेत असतानाचे ए. एच. मुल्लर यांनी काढलेले भव्य देखणे चित्र येथे आहे. या चित्रातील शिवाजी महाराजांची आवळलेली मूठ त्यांच्या मनातील भावभावनांचे दर्शन घडवते. त्याच वेळी संभाजीराजे मात्र कोणतीही चिंता नसल्याने बालसुलभ स्वभावानुसार खिडकीत तलवारीशी खेळत बसले आहेत, तर हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर या महारजांच्या सेवकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.

राजा रवी वर्मा दालन :

या दालनामध्ये राजा रवी वर्मा यांची मूळ तीन पेंटिंग आहेत. यामध्ये मल्याळी स्त्री, सौरांद्री व दमयंती यांचा समावेश होतो. याच प्रमाणे बाळासाहेब महाराज यांनी नामवंत कलाकारांकडून राजा रवी वर्मांच्या इतर चित्रांच्या प्रतिकृती तयार करून घेतल्या अशा चित्रांचा समावेश या दालनात करण्यात आलेला आहे.
श्रीमंत भवानरावांनी रा. द. चितारी आणि डी. व्ही. पंडित यांच्याकडून १९२८ ते १९३२ या काळात राजा रविवर्मा यांनी काढलेल्या अनेक चित्रांच्या प्रतिकृती तयार करून घेतल्या. मूळ चित्रांइतक्‍याच प्रतिकृतीही हुबेहूब वठल्या आहेत. गंगा-शंतनू, पुतना वध, आई आणि मूल, राधाकृष्ण ही चितारी यांची चित्रे आहेत. राधाकृष्ण आणि कृष्णाबरोबरच चितारलेला निसर्ग डोळ्यांना शीतलता देतो. सरोवराकाठी बसलेली राधा व कृष्ण, शीतल चंद्रप्रकाश आणि चंद्राचे सरोवरात पडलेले प्रतिबिंब हे सगळे इतके प्रभावीपणे मांडले आहे, की चुकून आवाज झाला, तर चित्रातील शांतता भंग पावेल किंवा सरोवरातील पाण्यावर थरार उमटतील, असे वाटते.या दालनातील शंतनू-सत्यवती, विश्‍वामित्र-मेनका, सैरंध्री ही डी. व्ही. पंडित यांची चित्रे आहेत. सैरंध्री या चित्रात कीचकासाठी मदिरा घेऊन निघालेल्या द्रौपदीच्या डोळ्यांतील असहायता स्पष्ट दिसते. तिचे डोळे इतके भरून आले आहेत, की पुढच्याच क्षणी त्यातून अश्रू ओघळतील, असे वाटल्याने आपण क्षणभर तिथेच थबकतो.राजा रविवर्मा यांनी काढलेली सैरंध्री ( १८९० ), दमयंती ( १८९४ ), मल्याळी तरुणी ( १८९२ ) ही चित्रेही संग्रहालयात आहेत. सैरंध्री हे त्यांचे उत्कृष्ट भावनादर्शक चित्र आहे. दुःखी झालेली सैरंध्री डोळ्यांना पदर लावून कीचकाच्या महालातून बाहेर पडते आहे व त्याच वेळी तिच्याकडे पाहणारा द्वारपाल या दोघांच्याही चेहऱ्यांवरील भाव खिळवून ठेवणारे आहेत. व्यक्तिचित्रणाकडे लक्ष देताना पार्श्‍वभूमीलाही त्यांनी तेवढेच महत्त्व दिले आहे. मागील भिंतीवरील हत्तीचे नक्षीकाम, दगडी पायऱ्या, जोत्याला असलेले लोखंडी कडे व त्याची सावली हे बारकावेदेखील तेवढ्याच तादात्म्याने मांडले आहेत. "दमयंती' चित्रातील दमयंतीचे रडून लाल झालेले डोळे पतिविरहाच्या दुःखाची तीव्रता दाखवतात.

"शिवतांडवनृत्य" चित्राचा भरमाप्पा कोट्याळकर दालन :

कर्नाटकातील चित्रकार श्री.बरमाप्पा कोत्याळकर या कलावंताच्या चित्रांचा समावेश यामध्ये आहे. यांच वैशिष्ठ्य म्हणजे बी.आर.कोत्याळकर यांनी चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नव्हते पण ते जन्मजात कलाकार असल्याने त्यांनी 'भीम व ऐरावत' , 'शिवतांडव' , 'गोकुळात परत,द्रौपदी वस्त्र हरण अशी पौराणिक चित्रे रेखाटली आहेत.
भरमाप्पा कोट्याळकर जवळजवळ वीस वर्षे संस्थानात होते। श्रीमंत भवानरावांना कीर्तनाचाही छंद होता. मोठी मेहनत घेऊन ते कीर्तन करायला शिकले होते. राजवाड्यासमोरील देवीच्या मंदिरात ते कीर्तन करत. त्या वेळी भरमाप्पा एका कोपऱ्यात बसत आणि कीर्तनातील कथांना जागच्या जागी चित्ररूप देत असत. अशी पाच-पाच फुटी त्यांची चित्रे आजही संग्रहालयात आहेत. चित्रातील व्यक्तींचे अचूक आणि निर्दोष रेखांकन हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यामुळे चित्रात व्यक्तींची गर्दी झाली, तरी मांडणी इतकी उत्तम, की प्रत्येक व्यक्ती लक्ष वेधून घेते. आपली सर्व निरीक्षणशक्ती त्यांनी प्रत्येक चित्रात पणाला लावल्याचे दिसते. त्रिपुरासुर वध, कृष्णशिष्टाई, शिवराज्याभिषेक, शिवतांडवनृत्य ही त्यांची चित्रे प्रसिद्ध आहेत. यांपैकी शिवतांडवनृत्य या चित्राला मजेदार इतिहास आहे. श्रीमंत राजेसाहेबांबरोबर भोजनासाठी रोज त्यांचे नातेवाईक व आश्रित असे जवळजवळ पन्नास लोक असत. त्यात भरमाप्पा कोट्याळकरही असत. भोजनगृहातील एक फलकावर श्रीमंत राजेसाहेब रोज एक श्‍लोक लिहीत. संस्कृत नाटकातील, काव्यातील अनेक श्‍लोक त्यांना पाठ होते. भोजनापूर्वी हे श्‍लोक म्हटले जात. एके दिवशी "मालतीमाधव' नाटकातील नमनाचा श्‍लोक त्यांनी लिहिला होता. तो भरमाप्पांना इतका आवडला, की त्यांनी ताबडतोब त्याचे चित्रांकन करून महाराजांना दाखवले. त्या श्‍लोकातील सर्व गोष्टी त्या चित्रात उतरल्या आहेत. भगवान शंकराच्या तांडवनृत्यामुळे मेघगर्जनेचा आभास निर्माण झाला आहे. शंकराचा निळा रंग मेघांसारखाच आहे. डोक्‍यावरील चंद्र विद्युल्लतेचा आभास निर्माण करत आहे. त्यामुळे कार्तिकेयाचे वाहन मयूर पर्जन्यराजाचे आगमन होणार म्हणून नृत्य करू लागले आहे. अशा प्रकारे पर्जन्याचे वातावरण निर्माण झाल्याने शंकराच्या अंगावरील नाग निवारा शोधू लागला आहे. जवळच नृत्यात तल्लीन झालेल्या गजराजाची सोंड म्हणजे बीळ समजून तो त्यात शिरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या या प्रयत्नांमुळे विनायकाचे शरीर जोरात हलते व त्यातून सुगंध बाहेर पडतो. त्या सुगंधामुळे मधमाश्‍या विनायकाच्या भोवती रुंजी घालू लागल्या आहेत, असे हे मोठे विलोभनीय चित्र भरमाप्पांनी काढले आहे.
अनेकदा चित्रकारांच्या कलाकृतीचे कौतुक होते; परंतु त्यामागील कलाकारांचा विसर पडतो. कलाप्रेमी भवानराव मात्र याला अपवाद आहेत. या संग्रहालयात रावबहादूर एम. व्ही. धुरंधर यांनी काढलेले स्वतःचे चित्र, त्याचबरोबर आर. के. वेलणकर, अंबिका धुरंधर, रामचंद्र चितारी, बाबूराव पेंटर यांचीही चित्रे आहेत.

अजंठा चित्रकला दालन :

१९२६ साली अजंठा लेणीतील चित्रांच्या प्रतिकृती काढण्यासाठी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मत करत काही निवडक चित्रकारांच्या मदतीने लेण्यांतील चित्रे साकारली त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकातल्या २६ शिल्पांचा समावेश आहे. आत्तापर्यंत अजिंठा वेरूळ मधील शिल्पांची बनविण्यात आलेली सर्वात सुंदर चित्रे हीच आहेत.

लघुशैलीतील चित्रे :

भारतीय चित्रकला पद्धतीतील चित्रांची संख्या ही जास्त असल्याने सलग दोन दालने यांनी भरलेली दिसून येतात.
यातील सर्वात जास्त आकर्षणाचे कारण म्हणजे अभिजात भारतीय लघुचित्र शैली. या चित्रशैलीत प्रभावी रेषा, मुलायम रंग, द्वीमित चित्रपद्धती, रंगलेपानाचे कौशल्य व विविध विषयांचा अंतर्भाव याकडे प्रत्येक कलाकार आकर्षिला जातो. या लघुचित्र शैलीत मोंगल, राजस्थानी, गढवाल, कांग्रा, दख्खन, महाराष्ट्र अशा सर्व घराण्यांच्या शैलीचा अंतर्भाव होतो.

भारतीय चित्र दालने १ व २ :

यातील किरातार्जुन ही ९७ चित्रांमधील कथा हे औंध चित्रसंग्रहालयाचे एक लाखमोलाचे लेणे म्हणता येईल. ही पहाडी शैलीतील कथा पंडित मालाराम यांनी साकारली आहे. ही कथा थोडक्यात अशी आहे - महाभारतातील होणाऱ्या युद्धाची अस्त्रे-शस्त्रे मिल्ब्विण्याची जबाबदारी जेव्हा अर्जुनावर येते तेव्हा अर्जुन परशुरामाचा सल्ला घेतात व परशुरामाच्या सल्ल्या नुसार शंकराची उपासना सुरु करतात या उपासनेच्या तेजोवलयाने इंद्र भयभीत होऊन ही उपासना मोडण्यासाठी स्वर्गीय अप्सरांना पाठवतो. अर्जुनाचे मन वळवू इच्छिणाऱ्या अप्सरा, गंधर्व यांनीही मनो विचलित न होणारा अर्जुन पाहून शंकर स्वत: त्याची परीक्षा घेण्याचे ठरवतात. ते किराताचे रूप घेतात. एकाच डुकरावरती किरातवेशधारी शंकर व अर्जुन बाण सोडतात व शिकारीच्या मालकीवरून दोघांमध्ये तुंबळ युद्ध होते. शेवटी शंकर अर्जुनाला आपले मूळ रूप दाखवतात व पशुपातास्त्र अर्जुनाला देतात.
ही कथा रेखाटताना मानवी भावनांचे उत्कट दर्शन घडून येते. तसेच अर्जुनाची तपश्चर्या, त्याची परशुरामाशी भेट, विविध अस्त्रांच्या लढाया, किरात, अप्सरा, गंधर्वांच्या शृंगरलीला, शय्या गृहातील कामक्रीडेची दृश्ये, किरात वेषधारी शंकराची डुकराची शिकार यातूनच विविध भावनांचे प्रकटीकरण होते. अर्जुन शंकराला उचलतो या एका चित्रात तर राग, द्वेष, मद, नैराश्य वगैरे चित्रवृत्तीचे अत्यंत रेखीव दर्शन चार तुकडे पाडून घडविले आहे. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेव्हा खोलीचा भास निर्माण करण्याची क्लुप्ती नसावी म्हणून सर्व चित्रे सपाट पृष्टभागावरती आहेत. यामध्ये कुठेही भडकपणा नाही पण तरीही उग्र-भयाण संघर्ष, अर्जुनाचे विविध भाव पूर्ण ताकतीनिशी रेखाटले आहे.

बंगाली चित्रकला दालन :

बंगाली शैलीतील चित्रांचे वेगळे दालन येथे आहे। नंदलाल बोस, भुवन वर्मा, शारदा उकील हे या शैलीचे पाईक होत। जलरंगाचा अतिशय देखणा वापर या शैलीत दिसतो. चित्र रेखाटन झाल्यानंतर रंग भरावयाचे व चित्र संपूर्ण धुवायचे, पुन्हा त्याच पद्धतीने रंग भरायचे, असे अनेक वेळा केल्यानंतर बारीक नाजूक रेषांनी चित्र पूर्ण करायचे, अशी ही शैली आहे. "दारुणावस्था', "भग्नतार', "जीवनज्योत' ही जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी भुवन वर्मा यांची चित्रे जीवनातील कटू सत्येही सांगतात.
बंगाली शैलीचे वेगळे वैशिष्ठ्य म्हणजे चित्र रेखाटन झाल्यानंतर रंग भरावयाचे व चित्र संपूर्ण धुवायचे पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने रंग भरवायचे असे ४ ते ५ वेळा केल्यानंतर बारीक नाजूक रंगाने चित्र पूर्ण करावयाचे अशी वेगळी शैली आहे.
रवींद्रनाथ टागोर,भूपान वर्मा,नंदलाल बोस,शारदा उकील, जेमिनी रोय, के.सि.खातू, यांचा कलाकृती पुढे प्रेक्षक नतमस्तक होतो.आशा निराशा , सुख दु:ख हे जीवनातील भावउन्मेष कलाकारांनी सौम्य जलरंगानी प्रभावीपणे चितारलेले आहेत.

जयपूर शैलीतील चित्रे :

त्यातील 'रागिणी नट' सारखी चित्रे त्यातील हत्ती, अंगे, कपड्यांची कलाकुसर वेगळाच प्रभाव टाकतात. साडेतीनशे वर्षापूर्वी काढलेले हत्तीवर आरूढ झालेल्या राजा जयसिंहाचे चित्र आजही ताजे करकरीत वाटते.

कांगडा शैलीतील अष्टनायिकांची मालिका :

अष्टनायीकांतील अभिसारिका, समजूत पटलेली गौरांगना आकर्षक आहेत. उत्कंठीत मुग्धा गुडगुडी ओढत उभी आहे तर उत्कंठीत मध्यमा आणि प्रौढा गच्चीत बसलेल्या आहेत. उत्कंठीत पर्कायेचे चित्र या तिघींपेक्षाही वेगळेच आहे. चारही नायिका प्रियकराची वाट उत्सुकतेने बघत असलेल्या, परंतु प्रत्येकीचा भाव वेगळा, प्रत्येकीची पार्श्वभूमी वेगळी, प्रत्येकीचा पोशाख वेगळा, वातावरण वेगळे रतिक्रीडेनंतर क्लान्त शांत पहुडलेल्या नायिकेच्या चेहऱ्यावरचे भाव- एकीकडे स्वर्गीय कृप्ती तर दुसरीकडे शिणवत्यांचा भाव हा एकत्रित रित्या चित्रांमध्ये जिवंत केला गेला आहे

मोगली शैली :

मोगली शैलीतील मिनिएचेर्स अधिक शैलीदार आणि संकेतबद्ध अशी जाणवतात. त्यांचे रंग अधिक गतिमान वाटतात. सळसळत्या रेषांचे राजस तेज आपल्याला आकर्षित करते. या बहुसंख्य चित्रातील शाहजानच्या पदरी असणाऱ्या भीमदेव या गुजराती चित्रकाराची २२ चित्रे.पर्शियन उमर खय्याम आणि शहा मोहद्दिन चीटली यांच्या चित्रातला तांबड्या व जांभळ्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा या विशेष भाव खाऊन जातात. सफायर नील्माण्यापासून बनवलेल्या असा जांभळ्या रंग इतरत्र क्वचित पाहायला मिळतो असे सांगण्यात येते.

गढवाल शैलीतील ५७ चित्रे :

या ५७ चित्रांमध्ये महिषासुर वधाची कथा रेखाटलेली आहे. तेजातून जन्म झालेली जगदंबा,कळीच्या रूपातील राक्त्ग्रीव मूर्ती,कुंथनिकुंभ ,चंद्मुंद,देवी चामर युद्ध,मधु कैटभ संघर्ष, नऊ रात्रीतील नऊ दिवसांची लढाई, सर्व देवतांनी आपापल्या शास्त्रांचे जगदंबेला केलेले समर्पण यातील जिवंतपणा चित्रात ओतला गेलेला आहे. तसेच या चित्रांच्या पार्श्वभूमीवर असलेली घरे व इमारती या मात्र अत्यंत सध्या व सरळसोट वाटतात. त्यात वैभव समृद्धीचा वा अलंकारिक शैलीचा प्रभाव कुठेच जाणवत नाही.

पंजाब स्कूल लघु चित्र शैली :

पंजाबी कलाकारांची १९व्या शतकाच्या सुरुवातीला बनवण्यात आलेली काही चित्रे या काळात भवानरावांनी आणलेली होती ही चित्रे महाभारतातील प्रसंग चित्रित करणारी होती. त्यातील काही खूपच अप्रतिम आहेत.

दक्षिण व उत्तर व्हरांडा

या भागामधे रहिमान, परंदेकर,जे.पि.गांगुली , बाळापंडित , चंद्रकांत मांडरे, ठाकुरसिंग इ. नामवंत कलाकारांनी काढलेली चित्रे लावण्यात आलेली आहेत.

मॅगझीन फ्लोअर

या मॅगझीन फ्लोअर मधे महाराज स्कूल, रजपूत स्कूल , विजापुर स्कूल, पहाड़ी स्कूल, रुक्मिणी स्वयंवर इ.शैलीतील मिनिअचुर पेंटिंग प्रदर्शित करण्यात आलेली आहेत.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय.....
औरंगजेब कैदेतील श्री.छ. शिवाजी महाराज
राजा रवी वर्मांचे 'सैरंध्री' चित्र
राजा रवी वर्मांचे 'दमयंती' चित्र
राजा रवी वर्मांचे 'मल्याळी तरुणी' चित्र
"शिवतांडवनृत्य"
किरतार्जुन युद्ध
रागिणी नट (जयपूर शैली)
राग भैरव (मोगल शैली)
उत्कठिन मुग्धा

पाश्यात्य चित्र कला दालन :

बाळासाहेब महाराज परदेशामध्ये जात त्यावेळी तेथील चित्रकारांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून चित्र विकत घेत किंवा भेट म्हणून घेत. त्यातील उल्लेखनीय चित्र म्हणजे सोलोमन यांनी रंगविलेले एका युवतीचे चित्र, वाघ, व सिंहाचे ए.बिन या चित्रकाराचे चित्र पोस्टर वर्क मध्ये केलेले आहे.
पाश्चात्य चित्रकलेमधे २ प्रकार अढळतात जल रंगातील व तेल रंगातील चित्रे जल रंगातील चित्रांमुळे इंग्रजी चित्रकारांनी जगात श्रेष्ठत्व मिळवले आहे तर इरानियन, डच, इंग्लिश तेलचित्रे आकाराने प्रचंड आतून ती दर्जेदार आहेत.
मिस टूथ,अँन बिन, मोरेलि,इ. नामवंत कलाकारांच्या येथे कलाकृति आहेत. या कलाकृति आकाराने प्रचंड असून, लाकडी चौकटिही तितक्याच दर्जेदार व कलाक्रुतिंच्या आहेत का.कु.सुतार यांचे नाव चौकटीवर कोरलेले आहे.
परदेशी चित्रकारांच्या दालनात "पॅरिसमधील रस्ता' हे एस. कॉर्निल या चित्रकाराचे भव्य चित्र आहे. सुमारे पावणेदोन मीटर लांब व पावणेदोन मीटर रुंद, असा या चित्रात केवळ पॅचवर्कच्या आधारे सावल्यांचा खेळ मोठ्या कौशल्याने दाखवला आहे. मेअर ऍल्डिन या चित्रकाराची व्हेनिस शहराचे दृश्‍य दाखवणारी चित्रे येथे आहेत. प्रसिद्ध चित्रकार एफ. मोरली यांनी "सोंगट्यांचा खेळ' या चित्रात व्यक्तींच्या चेहऱ्यावर जुगारातील अनिश्‍चितता प्रभावीपणे रेखाटली आहे. प्रतिस्पर्धी सोंगट्या टाकत असताना आता काय दान पडणार, या विचारात असलेल्या समोरील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील उत्सुकता, अनिश्‍चितता, भीती या भावनांचे मिश्रण आपल्याला पाहायला मिळते. त्याच वेळी खेळात पूर्णपणे गढून गेल्यामुळे हातात तसाच राहिलेला चिरुटही आपल्याला काही सांगत असतो. प्रत्यक्ष खेळात नसणाऱ्या; पण मागे राहून खेळातील उत्कंठतेचा आनंद घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भावही आपण ओळखू शकतो.फ्रेंच चित्रकार जी. शीअरसी यांचे "व्हॉलंटिअर' किंवा "बालसैनिक' या प्रसिद्ध चित्राची मूळ कलाकृती येथे आहे. कमरेला कुकरी बांधून हातात बंदूक घेऊन मोठ्या दिमाखात हा बालसैनिक उभा आहे; परंतु कसल्या तरी विचारात असल्याने बालस्वभावाला अनुसरून त्याने तोंडात बोट घातले आहे.जीन ऑगस्टे इंग्रेस या चित्रकाराच्या १८५६ मधील "स्प्रिंग' या चित्राची आणि आई व मूल या चित्राची डी. व्ही. पंडित यांनी केलेली प्रतिकृती, तसेच लालकाका यांनी केलेली "ऍडम अँड इव्ह' या चित्राची प्रतिकृती लक्ष वेधून घेते. "बेगरबॉय', "बागेतील मुले', "धुणे धुणाऱ्या महिला', "चहा पिणारा गृहस्थ', "बोकडाची गाडी' ही परदेशी चित्रकारांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रे मनाला समाधान देतात.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय.....
ऍडम अँड इव्ह
पॅरीस मधील एक रस्ता... कॉर्निल

हस्तिदंतातील शिल्पे :

रामचंद्र गुडीयार असाच एक कारवारचा शिल्पकार तो लाकडापासून अप्रतिम मूर्ती बनवत असे. त्याने त्याच्या गावात अनेक शिल्पे बनवली होती. एखादे शिल्प उत्तम बनले कि तो औंधच्या महाराजांना देत असे. त्याने एकदा पाच फुटी भव्य चौकट आणून भावनरावांना दिली होती या चौकटीमध्ये रामायणाविषयी अनेक चित्रे होती. भावनरावांनी १५०० रु. घेतलेली हि फ्रेम आज लाखो रुपयांना असेल. रामचंद्र सुबराव गुडिगार या शिल्पकाराला तर राजेसाहेबांनी तत्कालीन म्हैसूर संस्थानातील शिरसी येथून आणले होते। त्यांनी चंदनात कोरलेली अनेक शिल्पे येथे आहेत. त्यांपैकी १.५ बाय १.२ मीटर आकारातील चंदनाच्या दोन लाकडांमध्ये त्यांनी रामायण आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येकी वीस प्रसंग कोरले आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना स्वर्गातून पुष्पवृष्टी होत असल्याचेही त्यांनी दाखवले आहे. फार खोल न कोरतादेखील खोलीचा आभास किती प्रभावीपणे निर्माण करत येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुडिगारांची शिल्पे आहेत.
महादेव पाथरवट यांनी हस्तिदंतातून निर्माण केलेली अप्रतिम शिल्पे आहेत. हस्तिदंतामध्ये कोरलेल्या सुमारे साडेसात सेंटिमीटर उंचीच्या अंबारीत तर इतके बारकावे टिपले आहेत, की पाहणाऱ्याने आश्‍चर्य करीत राहावे. अंबारीत चढण्यासाठी छोटी शिडीदेखील हत्तीला लटकवली आहे. त्यासाठीच्या साखळीतील प्रत्येक कडी वेगळी आहे.
केशव देशपांडे नावाचा कर्नाटकी मुलगा बाळासाहेब महाराजांकडे १९२० ते १९३६ पर्यंत राहिला त्याने केलेली हस्तिदंतावरील कलाकुसर आजही त्याच्या कलेची साक्ष देते. विमानाची प्रतिकृती देखील त्याने तेव्हा बनवलेली आहे. यातील काही हस्तिदंती वस्तू बाबुराव पेंटर यांचे वडील कृष्ण मेस्त्री यांनी तयार केलेल्या आहेत तर काही वस्तू त्रिवेंद्र व दिल्ली येथून आणण्यात आलेल्या आहेत. यातील बर्याच बस्तू औंध गावातील मुलांनी देखील बनविल्या आहेत.

टिबेटियन कलावस्तु दालन :

यामधे श्रीमंत बाळासाहेब महाराजांचे ची.अप्पासाहेब पंत हे परदेशात भारताचे राजदूत म्हणून असताना त्यांनी संपादन केलेल्या टिबेटियन व इतर कला वस्तुंचा संग्रह यांचे प्रदर्शन या दालनात करण्यात आलेले आहे. यामधे टिबेटियन थंका, सोचा, व चांदीच्या वर्काने लिह्लेल्या टिबेटियन पोचा,लाकडी कला वस्तु, भुतानच्या महाराजांची सन १९५४ साली अप्पासहेबांना नजराना म्हणून दिलेला २५०० वर्षांपूर्वी रोमन दिवा अलबास्टर दगडातिल सुरई , चामडयाच्या कळसूत्री बाहुल्या, परदेशात मिळवलेले पदके वस्तु आहेत.

भरत कामाचे नमूने:

श्रीमंत बाळासाहेब महाराजांच्या तिसऱ्या पत्नीने (रमाबाई साहेब उर्फ़ माई साहेब) भरतकामाचे केलेल्या चित्रकृति प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. यामधील अग्राहून सुटका या कलाकृतिस सन १९३३ मधे जहांगीर आर्ट गॅलरी मधे गोल्ड मेडल मीळवले आहे

धातु कलावस्तु दालन :

१९३६ पर्यंत महाराजांनी शेकडो वस्तु जमवल्या . यामधे धातुंच्या कलात्मक मुर्त्या ,इतर कलावस्तु , भूगोल व मराठी कालीन शस्त्रे या मधे तलवार , ढाल , धनुष्य बाण , कुरहादी , चिल्खत, तोफेचे गोले, बंदुका इ. वस्तुंच्या समावेश आहे.

पॉटरीज डायरोमा :

या मधे प्रामुख्याने चायनीज व परदेशातील मोठ मोठ्या कलाकृति असलेल्या पोटरीज आकर्षक पद्धतीने प्रकास योजना करून प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय.....
'शिवचरित्र' चंदनात कोरलेले शिल्प
हिऱ्यांनी बनविलेले'भगवान विष्णू'
मराठी कालीन शस्त्रे
यामध्ये ग्रीक व इटालियन सुंदर संगमरवरी शिल्पांच्या समावेश होतो. यातील हेन्री मूर या जगप्रसिद्ध शिल्पकाराने बनवलेले एक शिल्प 'मदर अँड चाईल्ड' हे अजरामर शिल्प आहे. भारतातील महत्त्वाच्या संग्रहालय प्रदर्शनी मध्ये हे कधीतरी मांडले जाते. ब्रिटिशांनी देऊ केलेली मोठी किंमत नाकारून हे शिल्प भारताचा गौरव वाढवत आहे.
कोर्ट यार्ड मधील सावंतवाडी येथे बनवला गेलेला भव्य लाकडी बुद्धिबळपट देखील आज पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू आहे.
तसेच शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा या सहा ऋतूंचे ६ सुंदर पुतळे उभारले गेले आहेत. त्यांचे सुंदर चार ओळीत वर्णन रेखाटले आहे, आणि विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीसाठी घडविलेला वेगवेगळा आल्याचे सांगितले जाते. या मध्ये विशेष असे की, सदर शिल्पे बाळासाहेब महाराजांच्या सहा मुलींच्या चेहऱ्यावरून शिल्पकारांनी घडविलेल्या आहेत.

शरद :-

मोंदे करी सुंदर वेगळा
बंधूसि तैसी युवती पतीला
कुर्वंडीते, कुंकुम लाविभाळी
शरद ऋतूचा दसरा दिवाळी

हेमंत :-

हेमंत आला तशी थंडि आली
घेउनि उणीसि निवारलेली
शेकावया शेगडि पेटवीली
बाला सुरवावे बहु शोभावीली

शिशिर :-

लोन्ह्या गव्हाच्या बहुभोददायी
हुर्डा तसा शाळूहि शक्तिदायी
काढावया घेउनिया विळ्यासी
बाळा तशी ये शिशिरी वनासी

वसंत :-

वसंत वाटे अतिगोड साया
श्रुंगार केला विविध फुलांचा
वेणीत कानात करी कटीला
गळ्यात दुरडित उणे न त्याला

ग्रीष्म :-

हो विंझगा वातचि उन्ह आला
ये घाम वेणीभार मुक्त केला
त्यागी तसेआभरगांसि बाळा
हा ग्रीष्म तापे सुकवी तियेला

वर्षा :-

पर्जन्य वृष्टी भिजवी जनाला
निवारिती घेउनि टोपि त्याला
आनंद सर्वा जनतेसि झाला
वर्षाऋतू उद्धवि सस्थमाला

या सहा शिल्पांशिवाय रेप ऑफ सबाईन, व्हिनस, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज, प्रदेशातील शिल्पांच्या प्रतिकृती, अडम्स अॅन्ड इव्ह या सारखे उल्लेखनीय पुतळे आहेत. तसेच संग्रहालयाच्या सुरवातीलाच दोन बाजूस मौल्यवान दगडांपासून बनविण्यात आलेली बुद्धाची शिल्पे ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये एक काळ्या दगडातील व एक पिवळ्या दगडातील आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय.....
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प
शरद ऋतू (संगमरवरी पुतळा)

संग्रालय उत्कर्षातील प्रमुख टप्पे :

१९३८ श्रीमंत बाळासाहेब महाराज यांनी श्री यमाई देवीच्या डोंगाराच्या पायथ्याला श्री भवानी चित्र संग्रहालय व ग्रंथालयाची स्थापना केली.
१९५२ श्रीमंत अप्पासाहेब पंत यांनी श्री भवानी चित्र संग्रहालय व ग्रंथालय महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्त केले.
२००७ ग्रंथालयाची नवीन विस्तारित इमारत बांधण्यात आली.
नव्याने करण्यात आलेल्या प्रदर्शन व्यवस्थेमध्ये एकूण १८ गॅलरीज, २ मॅगनिज फ्लोअर, सुरक्षा कक्ष, भांडार गृह अशा एकूण ३२ विभागामध्ये प्रदर्शन व्यवस्था करण्यात आलेली आहे. नव्याने करण्यात आलेले विभाग पुढील प्रमाणे.
१.स्वागत कक्ष २. छायाचित्र विभाग ३.पंतप्रतिनिधी दालन ४.कोट्याळकर चित्र दालन ५. पाश्यात्य चित्र दालन ६. अजिंठा चित्रकला दालन ७.तिबेटीयन कलावस्तू दालन ८. बंगाली चित्रकला दालन ९. मिनिचर पेंटीग गॅलरी १०. भारतीय चित्रकार चित्रदालन ११. पाश्यात्य चित्र दालन १२. राजा रवी वर्मा चित्र दालन १३.धातू कला वस्तू दालन १४. हस्तीदंती कलावस्तू दालन १५. पोट्रेट १६.पॉटरीज डायरोमा १७.चीत्ररामायण १८. कोर्टयार्ड १९. भरत कामाचे नमुने २०. दक्षिण व्हरांडा २१.चंदनी कला वस्तू दालन २२. भारतीय चित्र कला दालन २३.पश्यात्य चित्रकला दालन २४. मॅगनिज फ्लोअर २५. जनरल कला वस्तू दालन २६. पश्यात्य चित्र कला दालन २७. पश्यात्य चित्र कला दालन २८. उत्तर व्हरांडा २९. कोर्टयार्ड ३०. ग्रंथालय
असे एकूण ३० विभाग आहेत.

 

स्त्रोत : संदर्भ सूची | श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय.....
पूर्वीचा 'शिल्पकला' विभाग
नविन 'शिल्पकला' विभाग
श्रीमंत बाळासाहेबांनी संग्रलयातील मौल्यवान वस्तूबरोबरच संग्रलयास उपयुक्त होतील अशा १५००० पुस्तकांचा संग्रह तसेच ३००० जुन्या हस्तलिखित पोथ्या यांचा संग्रह केलेला आहे. अश्या भव्य संग्रहाचे सध्या वेगळे ग्रंथालय बविले आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय.....
बाळासाहेबांचे शिल्प
संग्रहालय प्रेक्षकांकरीता सकाळी १०.०० पासून सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खुले असते.
प्रत्येक सोमवारी संग्रहालयास साप्ताहिक सुट्टी असते. तसेच २६ जानेवारी, धुलीवंदन, १ मे, १५ ऑगस्ट व दीपावली लक्ष्मीपूजन या दिवशी प्रेक्षकांकरीता बंद असते.
० प्रवेश शुल्क प्रौढांकरिता रु. ५ /-
० १२ वर्षापेक्षा लहान करिता रु. ३ / -
० संग्रहालयात फोटोग्राफी, घायाचीत्रण करण्यास मनाई आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय.....
संग्रलयाचे प्रवेशद्वार क्र.२
भावनरावांना या संग्रहालायाबद्दल इतके प्रेम होते, की एप्रिल १९५१ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्यावर संग्रहालयाजवळच्या जागेतच अंत्यसंस्कार करण्यात आले. भवानी संग्रहालय हे केवळ भावांरावांचे स्मृठीस्थळच नाही तर कलाप्रेमींचे तीर्थक्षेत्र आहे. भवानराव उर्फ बाळासाहेब पंत यांचे हे समाधिस्थान आज शांतता, समाधान आणि आनंद देणारे ठिकाण बनले आहे.
स्त्रोत : संदर्भ सूची | श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय.....
बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ